केज (प्रतिनिधी): स्वामी दयानंद प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर, केज येथे आयोजित करण्यात आलेला पालक मेळावा अत्यंत उत्साही वातावरण आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीला गती देणे आणि पालक-शिक्षक संवाद अधिक दृढ करणे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. राजेसाहेब देशमुख (पापा) हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. लक्ष्मणराव जाधव यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. जी. बी. गदळे सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी. बी. चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर श्री. जे. आर. मस्के यांनी प्रास्ताविक सादर करताना मेळाव्यामागील भूमिका स्पष्ट केली आणि उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.
यानंतर उपस्थित पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत विविध सूचना व्यक्त केल्या, ज्यामध्ये बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन वाघमारे यांनी, “मी स्वतः याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि आज माझा पाल्याही याच शाळेत शिकत आहे, याचा मला अभिमान वाटतो. या शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता वर्षानुवर्षे उत्तम रीतीने टिकवून ठेवली आहे,” असे सांगत समाधान व्यक्त केले.याप्रसंगी उत्रेश्वर जाधव, डॉ.अकबर मुलाणी,प्रियंका मस्के, संगीता खाडे,माया गायकवाड, दिलीप बनसोडे या पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पालकांनी मांडलेल्या विविध सूचना व शंकांना संस्थेचे सचिव श्री. जी. बी. गदळे यांनी संस्थेच्या वतीने अत्यंत सुलभ व समाधानकारक उत्तरे देऊन निरसन केले. यावेळी स्वतःचा कौटुंबिक अनुभव सांगताना गदळे सरांनी स्पष्ट केले की, “माझी तिन्ही मुले मराठी माध्यमाच्या शाळेतूनच शिकून आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. मराठी ही आपली मातृभाषा असल्याने मातृभाषेतून घेतलेले शिक्षण विद्यार्थ्यांना सहजरीत्या आणि सखोल समजते.” मराठी माध्यमातील मुलेही कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च ध्येये गाठू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. लक्ष्मणराव जाधव यांनी विद्यार्थ्यांची प्रगती, अभ्यास आणि सर्वांगीण विकासाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आपल्या भाषणात ते म्हणाले, “गंध कोणता पुसू नका, जात कोणती पुसू नका… डॉक्टर, शिक्षक व कोचिंग क्लास संचालकांची मुले ज्या शाळेत विश्वासाने प्रवेश घेतात, ती शाळा नक्कीच दर्जात्मक शिक्षण देत आहे. कारण याच शाळेने सर्वसामान्यांच्या लेकरांना घडवून मोठे केले आहे.” या शब्दांत त्यांनी शाळेच्या गुणवत्तेचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव केला.
अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थापक अध्यक्ष ॲड. राजेसाहेब देशमुख (पापा) यांनी, “शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कायमच आग्रही असते. सर्व तळागाळातील मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आपण निरंतर कार्यरत आहोत,” असे मत मांडले. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि पालक यांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे असल्याचे सांगत पालकांनी दिलेल्या सूचनांची योग्य दखल घेण्याचे आश्वासन दिले.
एकंदरीत शाळेच्या प्रगतीबाबत सर्व उपस्थितांनी पूर्ण समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका श्रीमती बी. बी. चाटे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे संचलन व्ही. बी. यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ए. डी. देशमुख,आर. एस. क्षीरसागर, जि. बी. डिरंगे, जी. डी. यादव व अनिता जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.









Leave a Reply