बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न; खा. रजनी पाटील यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न; खा. रजनी पाटील यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.

केज! प्रतिनिधि

संघटन सृजन अभियानांतर्गत केज येथे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला खासदार रजनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. पक्षाचे सरचिटणीस आदित्य पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. आगामी काळातील संघटनात्मक बांधणीवर भर देताना ते म्हणाले, “प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने ही आपली जबाबदारी मानून काम केले पाहिजे आणि केलेले काम प्रत्यक्ष दाखवून दिले पाहिजे. अधिवेशनात काँग्रेसची खरी ताकद काय आहे, याची प्रचिती मला आली. आता आपल्याला गाव पातळीवर समित्या स्थापन करायच्या असून विविध शिबिरांचे आयोजन करायचे आहे. रेड, येल्लो आणि ग्रीन झोननुसार नियोजनबद्ध काम करून सर्व हेवेदावे बाजूला ठेवत हातात हात घालून पुढे जायचे आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काँग्रेसची ताकद वाढवणे हेच आपले मुख्य ध्येय आहे.”

बैठकीदरम्यान उपस्थितांनी खासदार रजनी पाटील यांच्याशी विविध मुद्द्यांवर थेट संवाद साधला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सरचिटणीस आदित्य पाटील म्हणाले, “आज देश आणि संविधान वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन काम करताना, आपल्या आणि इतर पक्षांमधील विचारांचा सकारात्मक फरक आपण जनतेला दाखवून दिला पाहिजे.”

आपल्या मार्गदर्शनात खासदार रजनी पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला. त्या म्हणाल्या, “आज नागरिक मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा काँग्रेसशी जोडले जात आहेत. त्यामुळे आता आपल्याला सत्तेपर्यंत पोहोचण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आजची बैठक अत्यंत सकारात्मक झाली असून, सर्वांनी या चांगल्या दिवसांचे भागीदार व्हावे. पक्षामध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ आणि ‘एक कुटुंब एक तिकीट’ या तत्त्वाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.”पुढे बोलताना त्यांनी विविध जनप्रश्नांवर भाष्य केले. “सध्या महागाईचा मुद्दा सर्वसामान्यांना भेडसावत असून त्याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. राममंदिर चोरी प्रकरणावर काँग्रेसने ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. तसेच लाडकी बहीण योजनेतून राज्यातील तब्बल ९५ लाख महिलांना का वगळले, असा सवाल करत सरकारला धारेवर धरण्याची वेळ आली आहे,” असे त्या म्हणाल्या.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर भाष्य करताना खा. पाटील म्हणाल्या, “येणाऱ्या बीड जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे किमान दोन आकडी उमेदवार निवडून आलेच पाहिजेत. सर्वांना सोबत घेऊन जाणारी काँग्रेसची सर्वसमावेशक विचारधारा आहे. आपल्यात कधीही जातीवाद नव्हता आणि तीव्र इच्छाशक्ती बाळगली तर काहीही अशक्य नाही. देश वाचवण्याच्या या लढ्यात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा. मी पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत आहे, आपण सर्व मिळून लढू आणि जिंकू.”

सूत्रसंचालन हनुमंत सौदागर यांनी केले. संपूर्ण बीड जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे बैठकीत मोठा उत्साह दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!