केज!सुमीत मोरे
महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानचे राजे आणि थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे कार्य केले.शाहू महाराजांची जयंती ही प्रेरणा देणारी असावी त्यांच्या कार्य कर्तृत्वातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असे प्रतिपादन प्रा.डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त केज शहरातील स्वामी दयानंद प्रतिष्ठानच्या राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
राजर्षी शाहू विद्या मंदिर केज शाळेत शाहू महाराजांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते याही वर्षी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी. बी. चाटे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे सचिव जी. बी. गदळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मंचावर सेवानिवृत्त शिक्षक एस. ए. डापकर यांचीही उपस्थिती होती.प्रथम शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.शाळेच्या विद्यार्थिनी कु. वैष्णवी नंदूलाल मिसाळ, कु. संस्कृती जितेंद्र रोडे व कु. ज्ञानेश्वरी प्रवीण देशमुख यांनी शाहू महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शाळेमध्ये जलव्यवस्थापन निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये प्रथम बक्षीस कु. प्राची सुरेंद्र शिंदे, द्वितीय कु. अनुजा अर्जुन तिडके, तृतीय कु. संस्कृती जितेंद्र रोडे यांना देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
पुढे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. सौदागर म्हणाले बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला.प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराजांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. माणगाव येथील परिषदेत शाहू महाराज म्हणाले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मी कार्यकर्ता म्हणून काम करण्यास ही तयार आहे.जाती आणि अस्पृश्यता निवारण्यासाठी शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला.महापुरुष कोणाही एका जातीचे धर्माचे नसतात ते सर्वांचे असतात.आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत,महापुरुषांची जयंती मधून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे व समाजोपयोगी काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.समाज सुधारणेमध्ये व सामाजिक न्याय यामध्ये महाराजांचे योगदान अनमोल आहे असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या राजर्षी शाहू महाराजांनी समाजात शिक्षणाचा प्रसार आणि जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न करून सामाजिक न्याय प्रस्थापित केला. यावेळी त्यांनी प्रमुख वक्ते डॉ. सौदागर व सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व्ही. बी. यादव यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ए. डी. देशमुख, आर. एस. क्षीरसागर, जि. बी. डिरंगे, जे. आर. मस्के, ध्वजा गायकवाड, अनिता जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.









Leave a Reply