केज | प्रतिनिधी
केज तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत. दोन्ही कारखाने सुरु झाले आहे, ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. पण रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणार्या बहुतांश वाहनांच्यापाठीमागे रेडियम अथवा रिफ्लेक्टर लावलेले दिसून येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कारखाना संचालक यांनी याची सक्ती करुन होणारे अपघात टाळण्याची मागणी पत्रकार दिनकर जाधव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
दिवसेंदिवस रोडवरील अपघातांची संख्या वाढत आहे. वाढती अपघाताची संख्या कमी करण्यासाठी वाहतूक नियमांची जनजागृती तसेच त्यावर विविध उपाययोजना होणे गरजेचे आहे. सद्या साखर कारखाने सुरु झाले आहेत. रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणार्या वाहनांमुळे अनेक अपघात झालेली आहेत. या अपघातामध्ये अनेक निष्पाप बळी गेलेले आहेत. त्यामुळे साखर कारखानदार यांनी कारखान्यावर येणाऱ्या प्रत्येक ऊस वाहतूक वाहनांच्या मागे रेडियम, रिफ्लेक्टर लावणे सक्तीचे करावे. तसेच वाहतूक विभागाकडून वाहतूक नियमांचे पालन न करणार्या ऊस वाहतूक वाहनांवर कडक कार्यवाही होणे गरजेचे आहे. तसेच ऊस वाहतूक करणार्या वाहन चालकाने वाहतूकीच्या नियमाचे काटेकोटरपणे पालन करुन वाहनांना रेडियम, रिफ्लेक्टर लावण्याबाबत वाहन चालक व मालक यांना सुचना देण्यात याव्यात अशी मागणी पत्रकार दिनकर जाधव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.









Leave a Reply