*खो-खो विश्वचषक विजेती कर्णधार प्रियंका इंगळेचा जनविकास महाविद्यालयात भव्य सहकुटुंब सत्कार* *प्रियंकाने भारताचे नाव जगात गाजवले—-डॉ बाबासाहेब गोरे*

 

 

केज दि ६(प्रतिनिधी)

तालुक्यातील बनसारोळा

येथील जनविकास महाविद्यालयात भारताची पहिली महिला खो-खो विश्वचषक विजेती कर्णधार प्रियंका हनुमंत इंगळे हिच्या दैदीप्यमान यशाबद्दल जनविकास महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, सत्कारमूर्ती प्रियंका इंगळे तसेच प्रियंकाच्या मातोश्री सौ. सविता इंगळे, वडील श्री. हनुमंत इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रियंका इंगळे हिचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांच्या हस्ते बुके, शॉल,स्मृतीचिन्ह व रोख 11000/- रुपये देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देत असताना प्रियंका इंगळे हिने खो-खो खेळाविषयीचे स्वअनुभव सांगून विद्यार्थ्यांनी जे कोणते क्षेत्र निवडले आहे त्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन परिश्रम केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे यांनी प्रियंकाची कौटुंबिक पार्श्वभूमी सामान्य असतानाही तिने स्वकर्तत्वाने खो-खो सारख्या खेळात सातत्य ठेवून देशातील विश्वचषक खो-खो टीमचे नेतृत्व करून देशाला पहिला विश्वचषक मिळवून देण्याचे काम केले, हे अतिशय महत्त्वाचे असून आमच्या परिसरातील व आमच्या आप्तस्वकीयातील प्रियंकाचा व तीने केलेल्या कामगिरीचाआम्हाला अभिमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त व्यक्त करून तिच्या पुढील वाटचालीस त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. डॉ. गोपाळ भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक डॉ.सतीश कदम यांनी मानले. या कार्यक्रमास प्रियंका इंगळे यांचे नातेवाईक गावातील ग्रामस्थ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!