*बीडला करायचेय ‘जंक्शन’;*  *विविध कामांसाठी* *खा.सोनवणे रेल्वेमंत्र्यांच्या भेटीला* *केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झाली सकारात्मक चर्चा*

 

 

बीड: अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम गतीने सुरू आहे. बीडपर्यंत रेल्वेची जलदगती चाचणी देखील झाली असून पुढील वर्षात रेल्वेचे काम परळीपर्यंत पोहचेल व परळी ते मुंबई गाड्या बीडमार्गे जाऊ शकतील. दरम्यान, येडशी-बीड-जालना अथवा धाराशिव-बीड-छ. संभाजीनगर हा रेल्वेमार्ग मंजूर झाला तर बीडला मोठे जंक्शन होईल. यासाठी, खा.बजरंग सोनवणे यांनी दि.१० फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी नवीन रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक चर्चा झाली.

 

बीड जिल्हा तसा महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेला जिल्हा आहे. मात्र, याठिकाणी रेल्वेलाईन नसल्याने येथे मोठे उद्योग येऊ शकले नाही. दळणवळणाचा खर्चीक भाग असल्याने कंपन्या आणि व्यवसायाला चालना मिळालेली नाही. आता अहिल्यानगर-परळी रेल्वेमार्गाला गती मिळत आहे. खा.बजरंग सोनवणे यांनी लोकसभा निवडणूकीत विजयाचा गुलाल अंगावर पडताच पहिली बैठक रेल्वेची घेवून आहे त्या रेल्वे मार्गाला गती देण्याचा प्रयत्न केला. त्याचेच फळ आता दिसत असून अवघ्या सहा-सात महिन्यात अंमळनेर ते बीडपर्यंत रेल्वे धावली आहे. दरम्यान, जालना ते येडशी अथवा धाराशिव ते छ. संभाजीनगर हा रेल्वे मार्ग जोडला तर बीडला मोठे जंक्शन होऊ शकते. शिवाय बीड हे राज्यात सेंटरला येऊन विकासाला गती मिळू शकते. हे लक्षात घेवून सोमवारी खा.सोनवणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत, येडशी-बीड-जालना नवीन रेल्वे लाईनसाठी सर्व्हेक्षण करणे तसेच प्रस्तावित धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे लाईनचे ४८५७.४७ कोटी रुपये अंदाजित रकमेचे अंदाजपत्रकीय खर्चास प्रशासकीय मान्यता देणे. आहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर बार्शी नाका बीड येथील प्रस्तावित जागेवर नवीन रेल्वे स्थानक/थांबा देणे,

⁠आहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील उर्वरित प्रलंबित भूसंपादन प्रकरणे तातडीने मंजूर करणे, अशा मागण्यांचे पत्र दिले.

 

००

 

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिले आश्वासन

आहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी बीड येथे झालेल्या दि. १८ जून २०२४ च्या बैठकीमधे रेल्वे अधिकारी यांचेसोबत झालेल्या बैठकीमध्ये कालबद्ध कार्यक्रम ठरऊन देण्यात आला होता, त्यानुसार कामे पूर्ण करुन घेण्याचे आदेश देऊन इतर सर्व कामांबाबत दखल घेऊन योग्य असेल ती सर्व कामे करणेबाबत आश्वासित केले. छ.संभाजीनगर-गुंटूर, नांदेड-बेंगलुरु व पनवेल-नांदेड या गाड्यांना घाटनांदूर येथे थांबा देण्याबाबत चालू असलेल्या कारवाईचा आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!